logo

मोठी बातमी! ठाकरे गटाचा महत्त्वाचा शिलेदार शिंदे गटात सामील, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

लोकसभा निवडणूक जाहीर झाली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिंदे गटाकडून पुन्हा एकदा धक्का बसला आहे. विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी आज (१७ मार्च) रोजी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. विधान परिषदेसाठी २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडोमोडीनंतर सर्वांच्या चर्चेचे विषय राहिलेले आणि स्वत: उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलेले आमदार पाडवी यांनी शिंदे गटाला जवळ केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे.

ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आमश्या पाडवी यांच्यासह आदिवासी पारधी क्रांती सेनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे आणि १० महिला सरपंच, ४८ पुरुष सरपंच, २ जिल्हा परिषद सभापती, २ उपजिल्हाप्रमुख, ४ पंचायत समिती सदस्य, एक युवासेना जिल्हाधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार संजय शिरसाट, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

0
0 views